श्री ललितापंचमीची कहाणी PDF मराठी
Download PDF of Lalitapanchami Katha Marathi
Misc ✦ Vrat Katha (व्रत कथा संग्रह) ✦ मराठी
श्री ललितापंचमीची कहाणी मराठी Lyrics
|| श्री ललितापंचमीची कहाणी (Lalitapanchami Katha Marathi PDF) ||
आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहायचा, त्याला दोन जुळे मुलगे होते. दुर्दैवाने, त्यांच्या लहानपणीच त्यांचे आईवडील वारले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची सर्व संपत्ती बळकावली आणि त्या मुलांना बेघर केलं. भटकत भटकत ती मुलं एका नगरीत येऊन पोहोचली. दुपारची वेळ होती, चालून चालून ते दोघे दमले होते आणि भुकेनं त्यांचे जीव व्याकूळ झाले होते. त्यांचे चेहरे सुकून गेले होते.
तेव्हा एक चमत्कार घडला. एक ब्राह्मण आपल्या घरातून ‘काकबळी’ टाकण्यासाठी बाहेर आला. त्या ब्राह्मणाने त्या मुलांना पाहिलं, त्यांना आपल्या घरी बोलावलं, जेवायला दिलं आणि मग त्यांची सगळी हकीकत विचारली. मुलांनी आपली सर्व व्यथा सांगितली. ब्राह्मणाने त्या दोन्ही मुलांना आपल्या घरी ठेवून घेतलं आणि त्यांना वेदाध्ययन शिकवू लागला. मुलंही तिथे राहून वेद शिकू लागली. असं करता करता खूप दिवस लोटले.
पुढं काय झालं? तो ब्राह्मण ललितापंचमीचं व्रत करू लागला. शिष्यांनी गुरुजींना विचारलं, “हे आपण काय करता?” तेव्हा गुरुजी म्हणाले, “हे उपांगललितापंचमीचं व्रत आहे. या व्रतामुळे धन मिळतं, विद्या प्राप्त होते आणि इच्छित हेतू साध्य होतात.” हे ऐकून त्या शिष्यांनीही यथाशक्ती हे व्रत केलं. त्यामुळे त्यांना लवकर विद्या प्राप्त झाली. दोन्ही मुलांची लग्नं झाली. पुढे ते आपल्या नगरात परतले, श्रीमंत झाले आणि सुखाने, कीर्ति मिळवून राहू लागले. असे काही दिवस गेले.
पुढं काय चमत्कार झाला? दोन्ही भाऊ वेगळे झाले. थोरला भाऊ दरवर्षी आपलं ललितापंचमीचं व्रत न चुकता करत राहिला, त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली. धाकट्या भावाने मात्र व्रताची उपेक्षा केली, त्यामुळे देवीला राग आला आणि त्याला दारिद्र्य आलं. पुढं तो आणि त्याची बायको मोठ्या भावाकडे राहायला गेले. एके दिवशी मोठ्या भावाची बायको दिराला काही बोलली, त्यामुळे त्याला राग आला आणि त्याला खूप पश्चात्ताप झाला. त्याने आपल्या बायकोला सांगितलं, “मी उपांगललितेचं व्रत सोडलं, त्याचं हे मला फळ मिळालं आहे. हा अपमान सहन करून इथे राहणं चांगलं नाही. मी आता देवीला प्रसन्न करूनच घरी येईन!” असं बोलून तो निघून गेला.
पुढं त्याच्या भावाने त्याचा खूप शोध घेतला, पण तो काही सापडला नाही. हा भटकत भटकत एका नगराजवळ आला. त्या नगराबाहेर त्याला गुराखी भेटले. त्याने त्यांना विचारलं, “या गावाचं नाव काय? कोणता राजा इथे राहतो? उतरायला जागा कुठे मिळेल?” ते म्हणाले, “या गावाचं नाव उपांग आहे. इथे राजाही उपांगच आहे. इथे ललितेचं एक देऊळ आहे आणि तिथे एक मोठी धर्मशाळा आहे, तिथे तुम्हाला उतरायला जागा मिळेल. आम्ही त्याच गावातून आलो आहोत, आम्हाला तिकडेच जायचं आहे. तुम्हालाही यायचं असेल तर चला!” मग तो त्या नगरात गेला आणि धर्मशाळेत उतरला. त्याने देवीचं दर्शन घेतलं आणि अनन्यभावाने तिला शरण गेला. रात्री देवळातच झोपला.
देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला, “राजाकडे जा. माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग, त्याची नेहमी पूजा कर म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होतील.” इतकं सांगून देवी गुप्त झाली आणि तो जागा झाला. दुसऱ्या दिवशी तो राजाकडे गेला, देवीचा दृष्टांत सांगितला आणि पूजेचं झाकण मागितलं. राजाने ते दिलं. ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला. घरी नेऊन त्याची पूजा करू लागला आणि ललितादेवीचं व्रत करू लागला, तसे पुन्हा सुखाचे दिवस आले. त्याचे इच्छित मनोरथ पूर्ण झाले.
पुढं देवीच्या आशीर्वादाने त्याला मुलगी झाली. तिचं नाव ललिता ठेवलं. दिवसेंदिवस मुलगी मोठी झाली आणि सोबतीणींबरोबर खेळायला जाऊ लागली. पुढं काय चमत्कार घडला? एके दिवशी मुलीने ते झाकण घेतलं आणि नदीवर खेळायला गेली. तिथे जाऊन आंघोळ करू लागली. इतक्यात एका ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं. तिने त्याच्यावर झाकणाने पाणी उडवलं, तसा तो ब्राह्मण जिवंत झाला. देवीच्या प्रसादाने त्याला सुंदर रूप प्राप्त झालं. तिने ते पाहिलं आणि हा आपल्याला पती असावा असं तिला वाटलं. तिने आपला हेतू त्याला सांगितला. तेव्हा त्याने तिला विचारलं, “ही गोष्ट कशी घडेल?” तशी ती म्हणाली, “मी तुम्हाला घरी जेवायला बोलावते. जेवायच्या वेळेस ‘आपोषणी’ हातात घ्या आणि अडून बसा. म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील, ‘भटजी, भटजी, आपोषणी का घेत नाही?’ तेव्हा तुम्ही सांगा की, ‘आपली कन्या मला द्याल तर जेवतो नाहीतर असाच उठतो!’ म्हणजे ते देतील.”
त्याप्रमाणे तिने त्याला जेवायला बोलावलं. ब्राह्मण जेवायला बसू लागला आणि मुलीचं मागणं केलं. बापाने मुलगी देण्याचं कबूल केलं. सुखाने जेवण झालं. चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं. नवरानवरींची पाठवणी केली. घरी जातेवेळेस देवीचं प्रसादाचं झाकण घेऊन गेली, त्यामुळे बापाच्या घरातलं सगळं धन गेलं आणि त्याला दारिद्र्य आलं. तो फार गरीब झाला, तसं त्याच्या बायकोनं मुलीजवळ ते झाकण मागितलं. मुलीने ते दिलं नाही. तिने तो राग मनात ठेवला. एके दिवशी आई मुलीच्या घरी जाऊ लागली. जाताना वाटेत जावई भेटला, सासूने त्याला ठार मारलं आणि झाकण घेऊन ती घरी गेली.
इकडे मुलीच्या व्रताच्या पुण्याने जावई जिवंत झाला. उठून घरी गेला आणि बायकोला झालेली हकीकत सांगितली. तिला खूप आनंद झाला. पुढं ही सर्व हकीकत सासूला समजली, तशी ती जावयाच्या घरी आली. पटापटा पाया पडू लागली आणि केलेला अपराध कबूल झाली. तिला पश्चात्ताप झाला. अशा कर्मामुळे तिला गरिबी आली. तिचा नवरा नेहमी आश्चर्य करू लागला की असं वारंवार का होतं? याचं कारण काही केल्या त्याच्या लक्षात येईना; म्हणून तो वडील भावाकडे गेला. त्याला सगळी हकीकत सांगितली. तो म्हणाला, “तू ललितापंचमीच्या व्रताची हेळसांड करतोस, त्यायोगानं असं होतं. व्रतनेम यथास्थित कर, देवाची पूजा कर, म्हणजे तुझं कल्याण होईल!” त्याने तसं वागण्याचा निश्चय केला. घरी आला आणि व्रत करू लागला. हळू हळू दारिद्र्य गेलं. तो श्रीमंत झाला. त्याचे मनातले इष्ट हेतू पूर्ण झाले, तसे तुमचे आमचे होवोत.
ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowश्री ललितापंचमीची कहाणी
READ
श्री ललितापंचमीची कहाणी
on HinduNidhi Android App
DOWNLOAD ONCE, READ ANYTIME
