|| श्री नागपंचमीची कथा (Nagpanchami Katha Marathi PDF) ||
श्रावण महिन्यातील नागपंचमीच्या दिवशी, एका गावात एक शेतकरी राहायचा. त्याच्या शेतात नागाचे वारूळ होते. एके दिवशी शेतात नांगरताना, नांगराच्या फाळाने वारुळातील नागाची पिल्ले चिरडून गेली आणि ती मरण पावली.
थोवेळाने नागीण वारुळाजवळ आली. आपले वारूळ आणि पिल्ले तिथे नसल्याचे पाहून तिला धक्का बसला. आजूबाजूला पाहिल्यावर तिला रक्ताने माखलेला नांगराचा फाळ दिसला. “या शेतकऱ्याच्या नांगरानेच माझी पिल्ले मारली,” असे तिच्या मनात आले. तिने त्या शेतकऱ्याच्या घराण्याचा नाश करायचे ठरवले. ती रागाने फणफणत शेतकऱ्याच्या घरी गेली आणि त्याने, त्याची बायको, मुले आणि सुना अशा सर्वांना दंश केला. त्यामुळे ते सर्वजण जागीच मरण पावले.
नंतर नागिणीला समजले की शेतकऱ्याची एक मुलगी परगावी आहे. तिलाही दंश करण्यासाठी ती तिच्या सासरी निघाली. तिथे पोहोचल्यावर नागिणीने पाहिले की त्या मुलीने एका पाटावर नागीण आणि तिची नऊ पिल्ले काढली आहेत. ती त्यांची पूजा करत होती, दुधाचा नैवेद्य दाखवत होती आणि नागाला लाह्या, दुर्वा वाहत होती. हे पाहून नागीण खूप संतुष्ट झाली. तिने दूध प्यायले आणि चंदनात आनंदाने लोळली.
नागिणीने मुलीला विचारले, “बाई, तू कोण आहेस? तुझे आई-वडील कुठे आहेत?” हे ऐकून मुलीने डोळे उघडले आणि समोर प्रत्यक्ष नागिणीला पाहून ती घाबरली. नागिणीने तिला धीर दिला आणि म्हणाली, “घाबरू नकोस. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दे.”
मुलीने आपली सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून नागिणीला खूप वाईट वाटले. ती मनात म्हणाली, “ही मुलगी मला इतक्या भक्तीने पुजत आहे, माझे व्रत पाळत आहे आणि मी हिच्या वडिलांच्या घराण्याचा नाश करण्याचा विचार केला, हे योग्य नाही.”
नागिणीने मुलीला सर्व घडलेला प्रकार सांगितला. मुलीलाही ते ऐकून खूप वाईट वाटले. तिने नागिणीला आपले आई-वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिणीने तिला अमृत आणून दिले. ते अमृत घेऊन ती लगेच आपल्या माहेरी परतली. तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातले आणि सर्वजण जिवंत झाले. हे पाहून सर्वांना खूप आनंद झाला.
मुलीने वडिलांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. तेव्हा त्यांनी विचारले, “हे व्रत कसे करावे?” मुलीने त्यांना व्रताची संपूर्ण विधी सांगितली आणि शेवटी सांगितले की, जरी काही करता आले नाही, तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये आणि नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून तो शेतकरी नागपंचमीचे व्रत पाळू लागला.
जशी नागीण त्यांना प्रसन्न झाली, तशी ती आपल्या सर्वांनाही होवो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
Found a Mistake or Error? Report it Now