श्री श्रावण सोमवार कहाणी PDF मराठी
Download PDF of Shravan Somvar Katha Marathi
Shiva ✦ Vrat Katha (व्रत कथा संग्रह) ✦ मराठी
श्री श्रावण सोमवार कहाणी मराठी Lyrics
|| श्री श्रावण सोमवार कहाणी (Shravan Somvar Katha Marathi PDF) ||
एका आटपाट नगरात एक राजा राहत होता. त्याला चार सुना होत्या – तीन आवडत्या आणि एक नावडती. राजा आवडत्या सुनांना चांगल्या वस्तू आणून देत असे, पण नावडतीला मात्र उष्टं-खरकटं जेवायला, जाडं-भरडं नेसायला, राहायला गुरांचं घर आणि गुराख्याचं काम देत असे.
श्रावण महिना सुरू झाला आणि पहिला सोमवार आला. त्या दिवशी नावडतीची भेट नागकन्या आणि देवकन्येशी झाली. त्या कुठे जात आहेत, हे विचारल्यावर समजलं की त्या महादेवाच्या देवळात शिवाची मूठ वाहायला जात होत्या. नावडतीने विचारलं, “त्याने काय होतं?” त्यावर नागकन्या आणि देवकन्येने सांगितलं, “भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीस जातं, मूलबाळ होतं, नावडती माणसं आवडती होतात, आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो.”
मग नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं, “तू कोणाची कोण?” नावडतीने सांगितलं की ती राजाची सून आहे आणि ती त्यांच्यासोबत देवळात गेली.
शिवामूठीचा वसा
नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या, तेव्हा नावडतीने विचारलं, “काय बोलताय?” त्यांनी सांगितलं, “आम्ही शिवामूठीचा वसा वसतो आहोत.” नावडतीने विचारलं, “या वसाला नेमकं काय करावं लागतं?”
त्यांनी तिला समजावून सांगितलं: “एक मूठभर तांदूळ घ्यावे, एक शिवराई सुपारी, गंध-फूल आणि दोन बेलाची पानं घ्यावीत. मनोभावे पूजा करावी. हातात तांदूळ घेऊन म्हणावे: ‘शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरादेवा, सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा!’ असं म्हणून तांदूळ वाहावेत. संध्याकाळपर्यंत उपास नाही निभावला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल वाहावा आणि मुकाट्याने जेवण करावं. हा वसा पाच वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि पाचव्यास सातू शिवमूठीसाठी घ्यावे.”
अशी झाली पूजा सफल
पहिल्या सोमवारी नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला पूजेचं सगळं साहित्य दिलं. दुसऱ्या सोमवारी तिने घरून साहित्य आणायला सांगितलं. त्या दिवशी नावडतीने मनोभावे पूजा केली आणि संपूर्ण दिवस उपवास केला. जावा-नणंदांनी उष्टं-माष्टं पान दिलं, ते तिने गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन झोपून राहिली.
पुढचा दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं आणि नागकन्येसोबत जाऊन मनोभावे पूजा केली. तिने ‘शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, नावडती आहे आवडती कर रे देवा’ असं म्हणून तीळ वाहिले. संपूर्ण दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिलं, दूध पिऊन झोपून राहिली. संध्याकाळी सासऱ्याने विचारलं, “तुझा देव कुठे आहे?” नावडतीने सांगितलं, “माझा देव लांब आहे, वाटा कठीण आहेत, कांटेकुटे आहेत, साप-वाघ आहेत, तिथे माझा देव आहे.”
पुढचा तिसरा सोमवार आला. नावडतीने पूजेचं सामान घेतलं आणि देवाला जाऊ लागली. घरची माणसं तिच्यामागे येऊ लागली आणि म्हणाले, “नावडती, तुझा देव दाखव.” नावडतीला रोजचा सराव असल्यामुळे तिला काही वाटलं नाही, पण सगळ्यांना खूप कांटेकुटे लागले. त्यांना नावडतीची दया आली. ‘आजपर्यंत ती रानात कशी येत असेल कोण जाणे,’ असा विचार त्यांना आला.
वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं
नावडतीला चिंता पडली आणि तिने देवाला प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या आणि देवकन्येसह ते देऊळ सोन्याचं झालं. खांब रत्नजडित झाले. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली, गंध-फूल वाहू लागली. नंतर शिवमूठ घेऊन ‘शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, नावडती आहे आवडती कर रे देवा’ असं म्हणून तिने शिवाला वाहिली.
राजाला खूप आनंद झाला. नावडतीवरचं त्याचं प्रेम वाढलं. तिने दागिने घालायला दिले. राजाने खुंटीवर पागोटं ठेवून तलाव पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले. राजा परत आला आणि म्हणाला, “माझं पागोटं देवळी राहिलं, घेऊन येतो.” देवळाजवळ आला तेव्हा देऊळ अदृश्य झालेलं होतं. तिथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती. त्यावर नावडतीने केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर पागोटं होतं. ते घेऊन राजा बाहेर आला आणि सुनेला विचारू लागला, “हे असं कसं झालं?” सुनेने सांगितलं, “माझ्या गरिबाचा हाच देव. मी देवाला प्रार्थना केली, त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं.”
सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेण्यात आलं. जी नावडती होती, ती आता आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला, तसा तुम्हा-आम्हा सर्वांना होवो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowश्री श्रावण सोमवार कहाणी
READ
श्री श्रावण सोमवार कहाणी
on HinduNidhi Android App
DOWNLOAD ONCE, READ ANYTIME
Your PDF download will start in 15 seconds
CLOSE THIS
