Download HinduNidhi App
Parvati Ji

हरतालिकेची कहाणी व्रताची कथा

Hartalika Teej Vrat Katha Marathi

Parvati JiVrat Katha (व्रत कथा संग्रह)मराठी
Share This

।।हरतालिकेची कहाणी कथा (हरतालिका तीज व्रत कथा मराठी)।।

एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो.

तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते व्रत ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षं तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दु:ख सहन केलीस.

हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दु:ख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी ‍त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहेत ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांने ही गोष्ट कबूल केली.

नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तू सांगितलंस, महादेवावाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे, असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली.

जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतिये चा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं. आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही! नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो.

हरतालिका कहाणी ऐका

पुढे दुसर्‍या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथं आला: त्यांन तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे.

ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो.

साता जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात. दळिद्रं येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.

Read in More Languages:

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App

Download हरतालिकेची कहाणी व्रताची कथा PDF

हरतालिकेची कहाणी व्रताची कथा PDF

Leave a Comment