कृष्णाच्या जन्माची कहाणी PDF मराठी
Download PDF of Krishan Janmashtami Katha Marathi
Shri Krishna ✦ Vrat Katha (व्रत कथा संग्रह) ✦ मराठी
कृष्णाच्या जन्माची कहाणी मराठी Lyrics
॥ जन्माष्टमीचे व्रत कसे करावे ॥
- जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करावे. मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करावा.
- यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी.
- यानंतर सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करावी. धूप, दीप, नैवेद्य दाखवावा.
- श्रीकृष्णाची आरती करावी. पूजा करून पुरुषसूक्त, विष्णूसूक्ताचे स्तवन करावे. वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, पुराण, इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत रात्री जागरण करावे.
- गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण करावे. यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा.
- जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी. या दिवशी पंचोपचार करून उत्तरपूजा करावी. बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा.
- याच दिवशी काला करावा. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला. हा कृष्णाला फार प्रिय होता.
- श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत, असे मानले जाते. या दिवशी महाराष्ट्रात गोपाळकाल्याच्या निमीत्ताने दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वेगवेगळ्या प्रातांत वेगवेगळ्या परंपरेने जन्माष्टमी साजरी केली जाते.
॥ कृष्णाच्या जन्माची कहाणी (कृष्ण जन्माष्टमी) व्रत कथा मराठी ॥
कृष्णजन्माच्या कथेचा देखील गहन अर्थ आहे. देवकी हे शरीराचे प्रतीक आहे तर वासुदेव हे जीवनऊर्जेचे (प्राण) प्रतीक आहे. शरीरात जसजसा प्राण वाढतो तसा आनंदाचा (कृष्ण) जन्म होतो. पण अहंकार (कंस) त्या आनंदाला नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. कंस हा देवकीचा भाऊ आहे जो दर्शवितो की अहंकार हा शरीरासोबतच जन्माला येतो. जी व्यक्ती आनंदी आणि प्रसन्न असते ती दुसऱ्यासाठी कसलाही उपद्रव उत्पन्न करत नाही. जी व्यक्ती दुःखी आणि भावनिक स्तरावर क्लेशग्रस्त असते तीच फाटाफूट करण्यात धन्यता मानते. ज्यांना असे वाटते की आपल्यावर अन्याय झालाय ते आपल्या दुखावलेल्या अहंकारामुळे इतरांवर अन्याय करतात.
अहंकाराचा सर्वात मोठा शत्रू आनंद आहे. जेथे प्रेम आणि आनंद असतो तेथे अहंकार टिकत नाही आणि अहंकाराला त्यापुढे झुकावे लागते. एखादी व्यक्ती समाजात कितीही उच्चपदस्त असली तरी ती आपल्या छोट्या बाळासमोर पार विरघळून जाते. एखादी व्यक्ती कितीही कणखर असली तरी तिचे मुल जेंव्हा आजारी पडते तेंव्हा ती असहाय्य होतेच. अहंकार हा प्रेम, निरागसता आणि आनंद यांच्यापुढे विरघळतोच. कृष्ण म्हणजे आनंदाचे मूर्तिमंत रूप, निरागसतेचा सार आणि प्रेमाचा आत्यंतिक स्रोत होय.
कंसाने देवकी आणि वासुदेव यांना घडविलेला तुरुंगवास हे दर्शवितो की, जेंव्हा अहंकार प्रबळ होतो तेंव्हा शरीर तुरुंगासारखे वाटते. जेंव्हा कृष्णाचा जन्म झाला तेंव्हा तुरुंगाचे रक्षक झोपी गेले होते. येथे आपली ज्ञानेंद्रिये हीच रक्षक आहेत जे अहंकाराला जोपासतात. कारण ते जेंव्हा जागे असतात तेंव्हा त्यांचे ध्यान बाह्यजगताकडे वळलेले असते. जेंव्हा ती ज्ञानेंद्रिये अंतर्मुख होतात तेंव्हा आपल्या अंतरंगातील आनंद बहरू लागतो.
कृष्णाला ‘माखनचोर’ म्हणूनही ओळखतात. दूध हे पोषकद्रव्यांचे सार आहे आणि दही हे दुधाचेच रूप आहे. दही घुसळल्यावर त्यातून लोणी बाहेर येते आणि वर तरंगू लागते. हे पौष्टिक असते आणि हलकेफुलके असते, जड नसते. त्याचप्रमाणे जेंव्हा आपली बुद्धी घुसळली जाते तेंव्हा ती लोण्यासारखी होते. जेंव्हा मनात ज्ञानाचा उदय होतो तेंव्हा ती व्यक्ती आपल्या अंतरात्म्यात स्थित होते. अशी व्यक्ती ह्या जगतापासून अनासक्त असते आणि त्या व्यक्तीचे मन संसारात गुंतून राहत नाही. कृष्णाचे लोणी चोरणे हे प्रेमाचा महिमा दर्शविणारे प्रतीक आहे. कृष्णाची मोहिनी आणि कुशलता इतकी आकर्षक आहे की तो आत्यंतिक वैराग्यपूर्ण व्यक्तीचेही मन चोरतो.
कृष्णाच्या डोक्यावर मोरपीस कां आहे? एक राजा आपल्या संपूर्ण प्रजेसाठी जबाबदार असतो आणि ती जबाबदारी ओझे बनू शकते जी त्याच्या डोक्यावर मुकुटाच्या रुपात असते. पण कृष्ण आपली जबाबदारी एखाद्या खेळाप्रमाणे सहजतेने, लीलया पार पाडतो. आईला आपल्या मुलांची काळजी घेणे हे कधीच ओझे वाटत नसते. त्याचप्रमाणे कृष्ण आपली जबाबदारी सहजतेने पार पाडतो आणि आपल्या भूमिका त्याच्या मुकुटावरील मोरपिसा सारख्या विविध रंगाने वठवतो.
कृष्ण हे आपल्या सर्वांच्या अंतरंगातील सर्वात मोहक, आनंदमय असे तत्व आहे. जेंव्हा मनात कसलीही बेचैनी, चिंता किंवा आकांक्षा नसते तेंव्हाच तुम्ही गहन विश्रांती घेऊ शकता. आणि अशा गहिऱ्या विश्रांतीतच कृष्णाचा जन्म होतो.
कृष्णजन्माचा संदेश हाच आहे की समाजात आनंद-लहरी आणण्याची हीच वेळ आहे. खरेच… आनंदी होणे “गांभीर्याने” घ्या.
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowकृष्णाच्या जन्माची कहाणी
READ
कृष्णाच्या जन्माची कहाणी
on HinduNidhi Android App