Misc

शुक्रवारची जिवतीची कहाणी

Shukravarachi Jivtichi Kahani Marathi

MiscVrat Katha (व्रत कथा संग्रह)मराठी
Share This

Join HinduNidhi WhatsApp Channel

Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!

Join Now

|| शुक्रवारची जिवतीची कहाणी (Shukravarachi Jivtichi Kahani PDF) ||

ऐका, शुक्रवारा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राज्य करत होता. त्याला मुलगा नव्हता. तेव्हा राणीने एका सुईणीला बोलावून आणलं आणि म्हणाली, “अगं, सुईणी, मला नाळेसहित एक मुलगा गुपचुप आणून दे. मी तुला खूप द्रव्य देईन!” सुईणीने ही गोष्ट मान्य केली आणि ती त्या शोधात राहिली.

गावात एका गरीब ब्राह्मणाची बायको गरोदर राहिली, तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला म्हणाली, “बाई, बाई, तू गरीब आहेस. तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन!” तिने होकार दिला. नंतर ती सुईण राणीकडे आली आणि म्हणाली, “बाईसाहेब, बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे आणि लक्षणं सर्व मुलाचीच दिसताहेत. तेव्हा आपल्या घरापासून तो तेथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं. आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन.” हे ऐकल्याबरोबर राणीला खूप आनंद झाला. जसे जसे दिवस होत गेले, त्याप्रमाणे डोहाळ्याचं ढोंग केलं. पोट मोठं दिसण्यासाठी त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या आणि भुयार तयार केलं. नऊ महिने भरताच बाळंतपणाची तयारी केली.

इकडे ब्राह्मणीबाईचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावणं आलं. तिने त्यांना “तुम्ही पुढं व्हा, मी येते” असं सांगितलं. धावत धावत ती राणीकडे आली आणि तिला पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं. नंतर ती ब्राह्मणाच्या घरी आली आणि म्हणाली, “बाई, बाई, ही तुझी पहिली खेप आहे. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, नाहीतर भीती वाटेल.” असं सांगून तिने तिचे डोळे बांधले. ती बाळंत झाली आणि तिला मुलगा झाला. सुईणीने एका दासीकडून भुयाराच्या वाटेने तो मुलगा राणीकडे पाठवला आणि स्वतः एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला व तो तिच्यापुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तिला वरवंटाच झाला असं सांगू लागली. तिने नशिबाला दोष दिला आणि मनात दुःखी झाली. सुईण राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली आणि मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं.

इकडे ब्राह्मणबाईने एक नियम धरला. श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, “जय जिवती आई माते, जिथं माझं बाळ असेल, तिथं खुशाल असो.” असं म्हणून तिने तांदूळ उडवावे, ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावेत. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या घालणं वर्ज्य केलं. कारल्याच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं आणि तांदुळाचं धूण वलांडणं बंद केलं. याप्रमाणे ती नेहमी वागू लागली.

इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी तो बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्हाऊन आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती, तेव्हा ह्याची नजर तिच्यावर गेली. हा तिच्यावर मोहित झाला आणि रात्री तिची भेट घ्यायचं त्याने ठरवलं. रात्री तो तिच्या घरी आला. दारात गाय-वासरू बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, “कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला!” तेव्हा ती म्हणाली, “जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही, तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्भय काय?” हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईकडून काशीला जाण्याची परवानगी घेतली. तो काशीला जाऊ लागला.

जाता जाता तो एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला खूप मुलं होत होती, पण ती पाचव्या-सहाव्या दिवशीच जात असत. राजा आला त्या दिवशी चमत्कार घडला. पाचवीचा दिवस होता. राजा दारात झोपला होता. सटवी रात्री आली आणि म्हणू लागली, “कोण गं मेलं वाटेत पसरलं आहे?” जिवती उत्तर देते, “अगं, अगं, माझं ते नवसाचं बाळ झोपलं आहे, मी काही त्याला वलांडू देणार नाही.” मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईवडील चिंता करत बसले होते, त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले. “तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला, आजचे दिवस मुक्काम करा,” अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री याप्रमाणेच प्रकार घडला. दुसऱ्या दिवशी राजा पुढे निघाला. इकडे ह्यांचा मुलगा वाढू लागला.

पुढे काशीत गेल्यावर त्याने यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली, पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले. असं होण्याचं कारण त्याने ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, “घरी जा, साऱ्या गावातल्या बायकापुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण समजेल.” त्याला मोठी चुटपुट लागली. तो घरी आला. त्याने मोठ्या थाटाचं माजवण (भोजन) केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, “घरी कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं.” ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. तिने राजाला निरोप धाडला, “मला जिवतीचं व्रत आहे. माझे खूप नेम आहेत. ते पाळले तरच मी जेवायला येईन!” राजाने कबूल केलं. जिथे तांदुळाचं धूण होतं ते काढून तिथे सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दर वेळेस “जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो,” असं ती म्हणे.

पुढे पानं वाढली. मोठा थाट जमला. राजाने तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता तो ज्या पंक्तीत ती बसली होती तिथे आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा फुटल्या, त्या त्याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून झोपला. काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली आणि त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, “असं होण्याचं कारण काय?” तिने सांगितलं, “ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई” – असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्याने आपल्या आई-वडिलांना राजवाड्यानजीक एक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्यासह तो राज्य करू लागला.

तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा होवो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

Found a Mistake or Error? Report it Now

Download शुक्रवारची जिवतीची कहाणी PDF

शुक्रवारची जिवतीची कहाणी PDF

Leave a Comment

Join WhatsApp Channel Download App