श्री ऋषिपंचमीची कहाणी PDF मराठी
Download PDF of Rishi Panchami Vrat Katha Marthi
Misc ✦ Vrat Katha (व्रत कथा संग्रह) ✦ मराठी
श्री ऋषिपंचमीची कहाणी मराठी Lyrics
|| श्री ऋषिपंचमीची कहाणी (Rishi Panchami Vrat Katha Marathi PDF) ||
ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी. एका आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो शेतीभाती करून सुखाने आपलं जीवन जगत होता. एके दिवशी त्याची बायको विटाळशी असतानाच घरात वावरली, विटाळाचे नियम पाळले नाहीत. या दोषाने काय झालं? तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला आणि त्या बाईला कुत्रीचा जन्म मिळाला. देवीची करणी!
दोघेही आपल्या मुलाच्या घरी होते. तो मुलगा खूप धार्मिक होता. तो देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी आणि घरी आलेल्या ब्राह्मणांचा आदरसत्कार करे. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. त्याने बायकोला सांगितलं, “आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर.”
इतक्यात एक चमत्कार घडला! खिरीचं भांडं उघडं होतं आणि त्यात एका सर्पाने आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीने पाहिलं. तिने मनात विचार केला, ‘ब्राह्मण खीर खातील आणि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पाप लागेल.’ म्हणून ती उठली आणि पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिने जळतं कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला आणि पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेवण घातलं, पण कुत्रीला उष्टं-माष्टंही घातलं नाही. तिचा दिवसभर उपास पडला.
रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ, म्हणजे बैलाजवळ गेली, आणि आक्रोश करून रडू लागली. बैलाने तिला कारण विचारलं, तेव्हा ती म्हणाली, “मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पाने गरळ टाकलं होतं, ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरू नयेत म्हणून मी पातेल्यास जाऊन शिवले. माझ्या सुनेला राग आला आणि तिने जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखतंय. ह्याला मी काय करू?”
बैलानं तिला उत्तर दिलं, “तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास. त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं. तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं.”
हे भाषण मुलाने ऐकलं. तो लगेच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला. कुत्रीला अन्न घातलं आणि दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात तो खूप दु:खी झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठला. तो घोर अरण्यात गेला. तिथे त्याने ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, “तू असा चिंताक्रांत का आहेस?” मुलाने सांगितलं, “माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल, ह्या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा.”
तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं, “तू ऋषिपंचमीचं व्रत कर!” ते व्रत कसं करावं हे त्यांनी समजावून सांगितलं: “भाद्रपद महिना येतो, चांदण्या पाखांतली पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं. आघाड्याची प्रार्थना करावी. त्याच्या काष्ठाने दंतधावन करावं. आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे, ते तेल केसांना लावावं, मग अंघोळ करावी. धुतलेली वस्त्रं नेसावीत. चांगल्या ठिकाणी जाऊन अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं सात वर्षं करावं आणि शेवटी उद्यापन करावं.”
“ह्या व्रताने काय होतं? रजस्वलादोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थांच्या स्नानाचं पुण्य लागतं. नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं आणि मनी इच्छिलेलं कार्य पूर्ण होतं.”
मुलानं ते व्रत केलं आणि त्याचं पुण्य आई-वडिलांना दिलं. त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. जो बैल होता, तो सुंदर पुरुष झाला. जी कुत्री होती, ती सुंदर स्त्री झाली. दोघेही विमानात बसून स्वर्गास गेले. मुलाचा हेतू पूर्ण झाला, तसा तुमचा आमचा होवो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण.
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowश्री ऋषिपंचमीची कहाणी
READ
श्री ऋषिपंचमीची कहाणी
on HinduNidhi Android App
DOWNLOAD ONCE, READ ANYTIME
